सोलापूर: आज देशभर भगवे वादळ आले आहे. अकलूजमधील सभेसाठी झालेली गर्दी पाहून मला लक्षात आले की, शरद पवार यांनी मैदान का सोडले. शरद पवारही मोठे खेळाडू आहेत, त्यांना हवेचा अंदाज येतो. ते स्वत:च नुकसान होऊ देत नाहीत, म्हणूनच त्यांनी भगव्या वादळाला घाबरून निवडणुकीतून माघार घेतली, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता़ माळशिरस) येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी मोदींनी शरद पवारांसह काँग्रेसवर जोरदार टीका केली. मी मागास असल्याने काँग्रेस नेत्यांनी अनेकदा माझी लायकी काढण्याचा प्रयत्न केला. मी खालच्या जातीचा असल्याचे दाखवून देत मला शिवीगाळ केली, असा आरोपही मोदींनी केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आ. नारायण पाटील, शिवसेनेचे शिवाजी सावंत, सुधाकरपंत परिचारक, आ. नीलम गोर्हे, माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचनताई कुल, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.